देव तारी त्याला कोण मारी ! …..आणि त्या एका मॅसेजमुळे त्याचा जीव वाचला

लग्नासाठी रजा मंजूर झाल्याचा मेसेज सीआरपीएफचा जवान ठका बेलकरला शेवटच्या क्षणी मिळताच बसमधून खाली उतरला… जवानांनी लग्नासाठी शुभेच्छा दिल्या… बस रवाना झाली… ठका कॅम्पवर माघारी फिरला आणि काही तासांतच सीआरपीफच्या नेमक्या त्याच बसवर पुलवामामध्ये आत्मघातकी कार बॉम्बहल्ला झाल्याची बातमी त्याच्या कानावर पडली…बसमधले सर्व सहकारी मृत्युमुखी पडले होते…साक्षात मृत्यूच्या जबडय़ातून परत आल्याची जाणीव ठकाला झाली, पण सर्व सहकाऱयांना गमावल्याच्या मानसिक धक्क्यातून ठका अजूनही सावरलेला नाही.

नगर जिह्यातल्या पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर टाकळी गावातला ठका बेलकर हा 28 वर्षांचा तरुण आरपीएफच्या 76 व्या बटालियनमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये तैनात होता. 14 फेब्रुवारीला ठकाच्या बटालियनला कश्मीर खोऱयाकडे कूच करण्याच्या सूचना मिळाल्या. एचआर 49 एफ 0637 या बसमधून जाणाऱया सीआरपीएफच्या 42 जवानांच्या नावाची यादी तयार झाली. यादीतील पंधराव्या क्रमांकावर ठकाचे नाव होते. ठकाचे 24 फेब्रुवारीला गावी लग्न आहे. लग्नासाठी सुट्टीचा अर्जही त्याने केला होता. सुट्टी मंजूर झाली नाही तर डय़ुटीवर जावे लागेल अशा सूचना त्याला मिळाल्या होत्या. त्यामुळे ठकाने कश्मीरकडे निघण्याची तयारी केली. लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या, मात्र रजा मंजूर झाली नव्हती. कर्तव्याच्या भावनेने ठका कश्मीर खोऱयाकडे बसमधून जाण्यास निघाला, पण बस रवाना होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच शेवटच्या क्षणाला रजा मंजूर केल्याचा मेसेज ठकाला मिळाला. ठकाच्या आनंदाला पारावर उरला नाही.


रजा मंजूर झाल्याची माहिती बसमधल्या सीआरएपीएफच्या सहकाऱयांना देताच सहकाऱयांनी ठकावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सहकाऱयांना कडक सॅल्यूट करीत ठकाने बसमधल्या सहकाऱयांचा निरोप घेतला आणि गावी जाण्याची तयारी सुरू केली. पण दुपारी सव्वातीनच्या सुमारास पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला झाल्याची बातमी आली. ठका ज्या बसमधून प्रवास करणार होता त्याच बसवर हल्ला झाला होता. काही तासांपूर्वी ज्या सहकाऱयांनी हसतखेळत ठकाला निरोप दिला त्या जवानांचा तो शेवटचा प्रवास ठरला होता. लग्नाची सुट्टी मिळाल्याचा आनंद काही क्षणातच मावळला. ठका गावी परतला…पण बसमधल्या सहकाऱयांचे चेहरे ठकाच्या डोळय़ांसमोरून हटत नाहीत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *