अक्षय कुमार नंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला शेतकऱ्यांना मदतीचा हात

मुंबई/ राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. सरकार या शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करत असतानाच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी देखील समोर आले आहेत. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत केली होती. तसेच आमिर खान हा पाणी फाउंडेशनच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांना मदत करतो. महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात समोर केला असून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना दोन कोटी 30 लाख रुपयांची मदत दिली आहे.

राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानांतर्गत वन टाइम सेटलमेंटसाठी पात्र असलेल्या राज्यातील सुमारे 360 शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी बच्चन यांनी 2.3 कोटी रुपये दिले आहेत. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ मराठवाड्यातील आहेत. तसेच राज्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना 2 कोटी तीस लाख रुपयांचे वाटप केले आहे. रविवारी सायंकाळी बच्चन यांच्या बंगल्यावर हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक दीड महिन्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. दरम्यान, बच्चन यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य करण्यासाठी मी काही देखील करू शकतो. केवळ दोनशे रुपयाचे कर्जासाठी अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच मी शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरवले आणि त्यानुसार हा कार्यक्रम हाती घेतला, असेही ते म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *